Sunday, March 10, 2013

पत्र चौथे:वर्तमानाच्या नजरेतून इतिहास....


वर्तमानाच्या नजरेतून इतिहास.... 

काश्मीरचा तरुण आणि त्याची मानसिकता यांचा विचार करताना काही गोष्टी प्रकर्षाने जाणवतात. त्यांची सध्याची मानसिकता तयार होण्यामागे ज्या 'इतिहासाची' भूमिका आहे, तो इतिहास आपल्या दृष्टीने वेगळा आणि त्यांच्या दृष्टीने वेगळा आहे.आपल्यासाठी भलेही हा इतिहास १७ व्या, १८ व्या, १९ व्या शतकाचे दाखले देत असेल, पण सामान्य काश्मीरी तरुणासाठीचा इतिहास गेल्या २० वर्षांचाच आहे.

बिजबिहाराच्या युवक गटाबरोबरच्या एका बैठकीमध्ये तेथील सततच्या अस्थिर परिस्थितीबद्दलचा विषय निघाला. हे सगळे नक्की कशामुळे होते? खरे कारण काय?असे विचारले असता त्यांनी एक घटना सांगितली. १९८५ साली (मकबूल बटच्या फाशीनंतर) बिजबिहारामध्ये एक जुलूस निघाला होता. त्यावर सुरक्षादलाकडून गोळीबार झाला, ज्यामध्ये ४० जण मारले गेले. त्यामुळे आज २०-२५ वर्षे वयाच्या तेथील तरुणासाठी हाच इतिहास आहे, की सैन्यदले आणि पर्यायाने भारत यांची काश्मीर व तेथील लोकांबाबतची भूमिका ही नकारार्थीच आहे. ज्या इतिहासाचे बाळकडू लहानपणापासून मिळते, तेच विचार मानसिकता घडवतात. १७ व्या, १८ व्या, १९ व्या शतकातील घटना,२०व्या शतकातील नव्या राजकीय प्रेरणा आणि चळवळी, शेख अब्दुल्ला, भारत, पाकिस्तान, ऊर्वरीत जग आणि काश्मीरचा वाढत गेलेला गुंता यांचा एकमेकांशी काय सबंध आहे हे सामान्य काश्मीरीला समजणे थोडेसे अवघड आहे; तेही विशेषत: मागील २० वर्षांमधील घडलेल्या घटना या जास्त प्रखर व प्रभावी असताना...

आज २१व्या शतकामधले आपण १७, १८, १९ व्या शतकातील घटनांची तार्किक सांगड घालण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा त्या काळातील साधने, माध्यमे, पद्धती, परंपरा या सगळ्यांचेच आकलन आणि अन्वयार्थ त्याच काळाच्या संदर्भाने लावला जातो का?हा विचारार्ह प्रश्न आहे. ८५ पासूनच्या पुढच्या घटनांचा प्रभाव असणार्या काश्मीरी तरुणांचे भविष्य घडवताना याच घटनांच्या अनुशंगाने असणार्या स्वाभिमानाला, अस्मितेला आणि भावनेला धक्का न लावता हळूहळू दाखले देत देत त्याही आधीच्या भूतकाळात नेले पाहिजे. व्यक्तीची मानसिकता तयार होण्यात इतिहास नक्कीच महत्वाचा आहे. पण म्हणून दोन शतकांपूर्वी(शतकांपूर्वी का दशकांपूर्वी?)इतिहासामध्ये *** असा अन्याय झाला म्हणून आत्ता आपण आंदोलन करत आहोत हे म्हणणे योग्य आहे का? भूतकाळात घडलेल्या चुकांपासून धडा घेऊन भविष्य सुधारण्यासाठी वर्तमानात त्या चुका पुन्हा घडू नयेत म्हणून इतिहास शिकावा, आणि नेमकी याच द्रष्टेपणाची कमी आपल्यामध्ये आढळते.

उदाहरणच द्यायचे झाले तर ते इकॉनॉमिक ब्लॉकेड चे देता येईल. दोन वर्षांपूर्वी अमरनाथ जमीन हस्तांतरणावरून जम्मू-काश्मीरमध्ये विवाद उद्भवला होता. तेव्हा जम्मूहून काश्मीरला जाणार्या सर्व जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा आणि काश्मीरमधून विक्रीसाठी बाहेर नेल्या जाणार्या सर्व वस्तूंची वाहतुक जम्मूमधील लोकांकडून अडवून धरण्यात आली होती. अशाच प्रकारच्या एका घटनेला इतिहास साक्षी असूनही असे पाऊल उचलले होते. १९४७ साली पाकिस्तानने काश्मीरची अगदी अशीच अडवणूक केली होती. त्याचा परिणाम म्हणून राजा हरिसिंगचे मत पकिस्तानसाठी प्रतिकूल तर भारतासाठी अनुकूल बनले होते; आणि भारताच्या बाजूला जोडणारा रस्ता बांधण्याचे काम युद्धपातळीवर हाती घेण्यात आले होते. या घटनेतून काहीही न शिकता २००८ च्या ब्लॉकेडमध्ये आपली गरज दाखवून देण्याचा प्रयत्न केला आणि परिणामत: काश्मीरमधील नागरीक आणि व्यापार्यांनी 'मुजफ्फराबाद चलो' च्या घोषणा देत पाकव्याप्त काश्मीरकडे मोर्चा वळवला. (खरे पाहता पाकिस्तानात जाण्याच्या अनुषंगाने बनवण्यात आलेल्या घोषणा आंतरराष्ट्रीय दबावामुळे आझाद काश्मीरपुरत्या सीमित झाल्या होत्या.)

ज्या घटिताच्या आधारावर आपण तर्क लढवतो आहोत, त्यापासून काश्मीरी तरुण कोसो दूर आहे. आणि म्हणूनच या पायावर मांडलेले आपले पुढे जाण्याचे, सुधारणेचे विचार त्याच्यासाठी 'परके' ठरतात. म्हणूनच त्याच्या विश्वातील इतिहासाशी आपली ओळख असणे गरजेचे. कारण योग्य ऐतिहासिक संदर्भ समजण्यासाठी आणि तो तेथील तरुणांपर्यंत पोहोचवण्यासाठी या ओळखीचा निश्चितच उपयोग होतो. तेव्हा आत्ताच्या परिस्थितीत काम करताना नक्की काय महत्त्वाचे?- १७, १८, १९ व्या शतकात घडलेल्या घटनांचा प्रतिक्रीयात्मक संदर्भ की मागील २० वर्षांच्या इतिहासाच्या संदर्भाने 'सुधारणां' साठी कृती करताना मागच्या चुका पुन्हा घडू नयेत यासाठी केलेला अभ्यास आणि प्रयत्न...?

No comments:

Post a Comment